पुणे – करोना आणि अन्य रुग्णांची ने-आण करण्यासाठी काही रुग्णवाहिका चालक जादा दर आकारत आर्थिक लूट करत आहेत. याची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) रुग्णवाहिकांचे दर निश्चित केले आहेत. यापेक्षा जादा दर आकारल्यास थेट रुग्णालय व्यवस्थापनावर कारवाई केली जाईल, असा आदेश आरटीओने दिला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांच्या प्रकारानुसार दरपत्रक निश्चित केले असून, रुग्णवाहिका आणि रुग्णालयाच्या दर्शनी भागात दरपत्रक प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. यानुसार भाडेआकारणी न झाल्यास याला रुग्णालय प्रशासनाची सहमती असल्याचे ग्राह्य धरून, त्यांच्यावर कोविड-19 आपत्कालीन कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. ही नियमावली संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी लागू आहे.
रुग्णवाहिकेचा प्रकार आणि दरपत्रक
1. मारुती व्हॅन- 25 किलोमीटर अथवा दोन तासांसाठी 500 रुपये आणि यापुढे अंतर गेल्यास मूळ भाड्यात प्रति किलोमीटर 11 रुपये. प्रतीक्षा दर प्रतितास 100 रु.
2. टाटा सुमो, मेटाडोरसह कंपनीने बांधणी केलेली रुग्णवाहिका- पहिले 25 किमी अथवा दोन तासांसाठी 600 रु. यापुढे 12 रु./किमी. प्रतीक्षा दर प्रतितास 125 रु.
3. मोठ्या आकाराच्या आणि चॅसिसवर बांधणी केलेल्या रुग्णवाहिका- पहिले 25 किलोमीटर अथवा दोन तासांसाठी 900 रु. पुढील अंतरासाठी 13 रु./किमी. प्रतीक्षा दर प्रतितास 150 रु.