पिंपरी, दि. 18 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात 14 जलतरण तलाव उभारले आहेत. जलतरण तलावाची खोली 9 फूट 10 इंचापेक्षा जास्त असू नये, असा नियम असतानाही पालिकेचे चार तलाव तब्बल 16 फूट खोलीचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तलावांची खोली कमी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेच्या क्रीडा विभागाचा अजब कारभार समोर आला आहे.
आकुर्डी प्राधिकरणातील जलतरण तलावात 9 मे 2022 रोजी एका महाविद्यालयीन युवकाचा पोहताना बुडून मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या चौकशीत चार तलावांची 16 फूट खोली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेमुळे जागे झालेल्या पालिकेच्या क्रीडा विभागाने तत्काळ हे चारही तलाव बंद करून खोली कमी करण्याचे काम हाती घेतले आहे.
महापालिकेने पिंपरी वाघेरे, कासारवाडी, पिंपळे-गुरव, संभाजीनगर, यमुनानगर, नेहरूनगर यासह 14 परिसरात जलतरण तलाव उभारले आहेत. या जलतरण तलावात पोहण्यासाठी नित्यनियमाने अनेक नागरिक येत असतात. उन्हाळ्यामध्ये पालिकेच्या तलावावर नागरिकांसह मुलांची मोठी गर्दी असते. मात्र, सध्या फक्त तीनच तलाव सुरू आहेत. तर तीन तलाव येत्या दोन दिवसात सुरू करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या क्रीडा विभागाकडून सांगण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात 14 जलतरण तलाव उभारण्यात आले आहेत. या तलावावर पोहण्यासाठी नागरिकांना 1 तासासाठी 10 रूपये तर महिन्याच्या पाससाठी नाममात्र शुल्कही ठेवण्यात आले आहे. मात्र, तलावाच्या देखभालीवर दरवर्षी तब्बल 7 कोटींचा खर्च होत आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी गत झाली आहे.
ऑलम्पिक स्पर्धेतही एवढे खोल तलाव नसतात
जलतरण तलावात बुडून एखादी दुर्घटना होऊ नये, यासाठी शासनाने काही नियम ठरवून दिले आहेत. तलावाची खोली 9 फूट 10 इंच असावी, प्रत्येक तलावावर लाइफ गार्ड असावेत, यासह विविध नियम आहेत. पालिकेच्या दहा जलतरण तलावाची खोली 4 ते 7 फूट इतकी आहे. मात्र, चार तलाव तब्बल 16 फूट खोली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेलाही 9 फूट खोलीचे जलतरण तलाव असताना पालिकेने कोणत्या धर्तीवर 16 फूट खोलीचे तलाव उभारले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
7 तलाव “पीपीपी’ तत्वावर चालविण्यासाठी देणार
खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने क्रीडा विभागाने शहरातील 7 जलतरण तलाव पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर चालविण्याठी देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र, या निविदेतील जाचक अटीमुळे प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा फेरनिविदा राबविण्यात येणार असल्याचे क्रीडा विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.