लोणावळा, दि. 18 (वार्ताहर) – ढगांच्या गडगडाटासह व विजेच्या लखलखटासह लोणावळा शहर व परिसरामध्ये दुपारी जोरदार पाऊस झाला अक्षरशः ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शहर व परिसरातील सर्व रस्ते जलमय झाले होते. मंगळवारी (दि.18) सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने लोणावळा शहर खंडाळा व आजूबाजूच्या ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढले.
मंगळवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीचा अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत असल्याचे चित्र पहायला मिळाले. गुरुद्वारासमोरील रस्ता, मगनलाल चिक्की समोरील रस्ता, मावळा पुतळा चौक फटाका स्टॉल समोरील रस्ता, बस स्थानकातून बस बाहेर पडते तो संपुर्ण रस्ता, शहानी हॉलिडे होम समोरील रस्त्यासह अनेक रस्ते जलमय झाले होते. लोणावळा व खंडाळ्यासह ग्रामीण भाग व कामशेत शहरात देखील परतीचा जोरदार पाऊस झाला.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ झाली होती तर भर दुपारी पावसामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळाला. दिवाळी सण चार दिवसावर आला असताना पावसाची दररोजची हजेरी नागरिकांसाठी त्रासदायक बनली आहे. ग्रामीण भागात हातातोंडाशी आलेले भात पिक पावसामुळे खराब होण्याच्या भितीने शेतकरी वर्ग चिंतातूर
झाला आहे.
लोणावळा शहरात मागील 24 तासात 45 मिमी (1.77 इंच) पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा शहरात यावर्षी आजपर्यंत 5488 मिमी (216.06 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजपर्यत 4768 मिमी (187.72 इंच) पाऊस झाला होता.