नवी दिल्ली – भारतीय लष्करातील जवान जावेद अहमद वाणीच्या अपहरणप्रकरणी पोलीस आणि सुरक्षा दलांचा तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणी अनेक लोकांची चौकशी केली. लडाखमध्ये तैनात असलेला जवान रविवारी कामावर परतणार होता. ईदच्या सणानिमित्त सुटी घेऊन तो घरी आला होता. सायंकाळी तो कारमधून काही साहित्य खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडला; तेव्हापासून तो बेपत्ता आहे.
आता पोलिसांनी जावेदच्या शोधासाठी मोठी मोहिम उघडली असून त्याच्याशी संबंधित अनेकांकडे माहिती घेतली जात आहे. तसेच त्याच्या फोनचे कॉल रेकॉर्डही तपासण्यात येत आहे. मात्र, मागील 24 तासात याबाबत काहीही सुगावा लागलेला नाही.
वाणीचे वडिल मोहम्मद अयुब वाणी यांनी आपल्या मुलाचे अपहरण करणाऱ्यांना आवाहन केले आहे की, तो कुटुंबाचा एकमेव कमावणारा असल्याने त्याला जिवंत सोडावे. जर त्याने कोणाला त्रास दिला असेल, तर मी त्याची माफी मागतो. जर अपहरणकर्त्यांची इच्छा असेल, तर मी त्याला नोकरीही सोडायला लावेन.माझा मुलगा शनिवारी संध्याकाळी मांस खरेदी करण्यासाठी बाहेर गेला होता. तो रविवारी आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी परतणार होता. मात्र आता त्याचा काहीही ठावठिकाणा लागत नाही.