मुंबई – भाजपचे आमदार म्हणत आहेत की, महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन केल्यामुळे राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून गेले. पण भाजप आमदारांनी नीट प्लॅनिंग करुन होर्डिंग्स सोबत आणले होते. आम्ही अभिभाषणाआधी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला, थोर व्यक्तींचा जयजयकार केला. पण भाजपचे आमदार राज्यपाल बोलायला लागल्यावर राजकीय आंदोलन करायला लागले. त्यामुळे राज्यपालांनी आपले अभिभाषण थोर व्यक्तींच्या दिलेल्या घोषणा ऐकून थांबवले की भाजप आमदारांनी केलेल्या राजकीय आंदोलनामुळे ? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांना केला आहे.
आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की, तुम्ही राज्यपालांचे अभिभाषण पाहिले तर त्यात कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्या मुद्द्याचाही समावेश होता. अभिभाषणात कुठेतरी या विषयावर महाराष्ट्र राज्याची भूमिका राज्यपालांनी मांडायला हवी होती. मात्र आज जे पाहिलं त्यानुसार राज्यपाल भाजपची भूमिका घेत होते की काय, असा प्रश्न पडला आहे.
अभिभाषण पूर्ण न वाचता, प्रोसिजरप्रमाणे राष्ट्रगीत व्हायला हवे होते त्यासाठी न थांबता राज्यपाल अर्ध्यातून निघून गेले. एवढया मोठ्या पदावरील व्यक्तीने अशा पद्धतीने वागणे हे कितपत योग्य आहे? असा सवालही रोहित पवार यांनी केला.