दिल्लीतील दंगलीची जबाबदारी केंद्राचीच -शरद पवार 

सत्ताधारी समाजात तेढ निर्माण करून राजकीय फायदा घेताहेत

मुंबई : राज्यकर्ते जर चुकीचे वागायला लागले, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत असतील तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल. दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही केंद्राकडे असते.

त्यामुळे दिल्लीत जे घडले त्याची पूर्ण जबाबदारी ही केंद्राची आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर केला आहे.

मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, एका बाजूला अमेरिकेच्या अध्यक्षांचे स्वागत केले जाते आणि दुसऱ्या बाजूला भारताच्या एका वर्गावर हल्ले केले जातात. केंद्रातील सत्ताधारी हे एका सांप्रदायिक विचाराने समाजात तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा करून घेत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

देशाच्या राजधानीला आग लागली आहे. दिल्ली शहरात समाजात फूट पडून विषारी वातावरण तयार केले आहे. निवडणूक झाल्यानंतर पंतप्रधान, गृहमंत्री, इतर मंत्र्यांचा रोख हा देशाच्या सामाजिक धार्मिक ऐक्‍याला छेद देणार होता. यांचा मंत्री म्हणतो “गोळी मारा’. सत्ता ही रक्षण करण्यासाठी असते तर दुसरीकडे यांचे मंत्री असे बोलतात.

आज दिल्लीची अवस्था बघा, सगळ्या प्रदेशातून येथे नागरिक येऊन राहतात. सांप्रदायिक विचाराने राजकारण करण्याचा पाडाव दिल्लीच्या नागरिकांनी केला. भाजपला सत्तेपासून लांब ठेवले यासाठी दिल्लीकरांचे अभिनंदन करायला हवे.

आपल्याला हवे ते होत नाही हे दिसल्यावर दिल्लीत आग लावण्याची, दगडफेक करण्याची सुरुवात केली. त्याच्यामागे सत्ताधारी पक्ष आहे. धर्म आणि जातीचा आधार घेऊन समाजात फूट पडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे शरद पवार म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.