शरीराचे कार्य सुरळीत चालावे यासाठी शरीराला अनेक पोषक घटकांची आवश्यकता असते. यातील महत्त्वाचे घटक म्हणजे प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे, खनिजे, तंतूमय पदार्थ, कॅल्शियम इत्यादी. आहारातून आणि योग्य त्या जीवनशैलीच्या माध्यमातून हे घटक शरीराला मिळत असतात; परंतु यातील एखाद्या घटकाचे प्रमाण कमी झाले की आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. मात्र असे होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. सध्या ज्या जीवनसत्त्वाची सगळीकडे जोरदार चर्चा असते ते म्हणजे ड जीवनसत्त्व.
शरीरातील ड जीवनसत्त्व कमी झाल्याने आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवत असल्याचेही आपण अनेकदा ऐकतो. मात्र, हे ड जीवनसत्त्व शरीरात योग्य प्रमाणात ठेवल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. पाहूयात ड जीवनसत्त्वाशी निगडित काही महत्त्वाच्या गोष्टी…
रक्तात असलेल्या कॅल्शियमचा हाडांना फारसा उपयोग नसतो. कारण हे कॅल्शियम हाडांमध्ये शोषले जात नाही. हाडांना कॅल्शियम योग्य प्रकारे शोषता यावे यासाठी जो घटक महत्त्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे “ड’ जीवनसत्त्व.
“ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्याने मुख्यत: हाडांच्या तक्रारी उद्भवतात. हाडे दुखणे, हाडांचा ठिसूळपणा इ. गोष्टी या कमतरतेमुळे जास्त प्रमाणात होतात.
शरीरातील कॅल्शिअमची नेमकी किती कमतरता आहे हे तपासण्यासाठी हाडांची घनता आणि “ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण तपासले जाते.
“ड’ जीवनसत्त्वासाठी सकाळच्या साधारण आठ ते नऊ वाजताच्या कोवळ्या उन्हाव्यतिरिक्त इतर चांगला स्रोत नाही. काही मासे, कॉर्डलिव्हर ऑईल, अंडी, संत्र्याचा रस, गव्हाचे पीठ, सोयाबीन, मशरुम, दूध, चीज यातून “ड’ जीवनसत्त्व मिळते, मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प असते.
रक्तातील कॅल्शियमची पातळी स्थिर ठेवण्यात “ड’ जीवनसत्त्वाचा मोठा वाटा असतो.
“ड’ जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या आणि मेंदूत न्यूरोट्रान्समीटर सोडणाऱ्या जनुकांचे नियमन करण्यासाठी उपयुक्त ठरते.