मुंबई – जेम्स ऍन्ड ज्वेलरी व्यवसायिकांनी एकत्रित येऊन मशिनरीचे क्लस्टर तयार करायचे असेल. तर उद्योग विभागामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या “ज्वेलरी मशिनरी ऍण्ड अलाईड इंटरनॅशनल एक्स्पो प्रॉडक्ट ऍन्ड एक्स्पो’ या प्रदर्शनाला आज त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन आजपासून 8 एप्रिल या दरम्यान होत आहे. यात ज्वेलरी तयार करण्यासाठी आवश्यक असणारे मशिन्स तसेच इतर सोयींची माहिती इथे मिळाणार आहे.
जेम्स ऍन्ड ज्वेलरीसाठी नवी मुंबईत शंभर एकर जागा दिली आहे. त्याबाबतचा सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी सुमारे एक हजार उद्योग उभे राहतील आणि दिड लाख रोजगार निर्माण होणार आहे, असेही देसाई यांनी सांगितले.
मूल्यवान रत्न विक्रीत भारत कायम अग्रस्थानी आहे. भारतातील कारागिरांच्या कौशल्याला जगभरातून मागणी आहे. कला ही कारागिरांच्या हातात असते. मशिन्स हे कारागिरांना मदत करण्यासाठी उपयोगी पडावे, त्यांच्या कार्यवृद्धीत सहयोगी व्हावे त्यांच्या कारागिरीला पर्याय निर्माण करण्यासाठी मशिन्सचे आक्रमण व्हायला नको. मेहनत कमी व्हावी मात्र त्यांची कला जिवंत रहावी, अशी अपेक्षा देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.