पिंपरी (प्रकाश यादव) – मूल जन्माला घालणे हे प्रत्येक महिलेसाठी जितके आनंददायी आहे तितकेच कठीण देखील आहे. मुलाला जन्म देणे म्हणजे महिलेचा दुसरा जन्मच म्हटले जाते, याला विविध कंगोरे आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सिझेरियन प्रसुतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असल्याचे पाच वर्षांतील आकडेवारीवरुन दिसून येत आहे. 2022-23 मध्ये 33 हजार 508 डिलिव्हरी झाल्या असून यामध्ये तब्बल 16 हजार 664 सिझेरियन तर 16 हजार 844 डिलिव्हरी नॉर्मल झाल्या आहेत.
प्रसुती दोन प्रकारांनी केली जाते. एक म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी आणि दुसरी म्हणजे सिझेरियन डिलिव्हरी. नॉर्मल डिलिव्हरी व्हावी अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जास्त धोका नसतो आणि काही दिवसांत स्त्रीचे शरीर पुन्हा पूर्ववत होते आणि ती आपले दैनंदिन आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकते.
परंतु जेव्हा आई किंवा बाळाच्या जिवाला, आरोग्याला धोका असण्याची शक्यता वाटू लागते तेव्हा सिझेरियन डिलिव्हरीचा पर्याय वापरला जातो. जेव्हा आई, बाळाच्या जीवाला किंवा आरोग्याला धोका निर्माण होणे, बाळाच्या ह्दयाची ठोके कमी होणे, रक्तदाब वाढणे, नाळ गळ्याभोवती असणे किंवा गर्भ पिशवीतील पाणी कमी होणे. याचबरोबर महिलांमध्ये प्रसुती वेदना सहन करण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने सोपा मार्ग म्हणून सिझेरियन डिलिव्हरी केली जाते.
पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या रूग्णालयांसह खासगी रूग्णालयात गर्भवती महिलांची डिलिव्हरी करण्याची सोय आहे. 2018-19 मध्ये शहरात 28 हजार 258 डिलिव्हरी झाल्या.
यापैकी 12 हजार 187 डिलिव्हरी या सिझेरियन तर 16 हजार 71 नॉर्मल, 2019-20 मध्ये 32 हजार 728 डिलिव्हरी झाल्या. यापैकी 12 हजार 445 डिलिव्हरी सिझेरियन तर 20 हजार 283 नॉर्मल, 2020-21 मध्ये 27 हजार 273 डिलिव्हरी झाल्या. यापैकी 10 हजार 310 डिलिव्हरी सिझेरियन तर 16 हजार 963 नॉर्मल झाल्या आहेत. 2021-22 मध्ये 31 मार्चअखेर 30 हजार 136 डिलिव्हरी झाल्या असून 12 हजार 598 सिझेरियन तर 17 हजार 538 डिलिव्हरी नॉर्मल झाल्या आहेत. तर 2022-23 मध्ये 31 मार्च अखेर 33 हजार 508 डिलिव्हरी झाल्या असून यामध्ये तब्बल 16 हजार 664 सिझेरियन तर 16 हजार 844 डिलिव्हरी नॉर्मल झाल्या आहेत.
सिझेरियनची कारणे
आई, बाळाच्या जीवाला किंवा आरोग्याला धोका निर्माण होणे
बाळाच्या ह्दयाची ठोके कमी होणे,
रक्तदाब वाढणे,
बाळाच्या गळ्याभोवती नाळ असणे
गर्भ पिशवीतील पाणी कमी होणे
बदलेली जीवनशैली, गर्भवती महिलांना वेळेवर रूग्णालयात दाखल केले जात नाही. त्यामुळे आई, बाळाच्या जीवाला किंवा आरोग्याला धोका निर्माण झाल्यास अशा विविध कारणांनी सिझेरियन डिलिव्हरी केली जाते. तसेच प्रसुती वेदना सहन करण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने सोपा मार्ग म्हणून सिझेरियन डिलिव्हरी केली जाते.
– डॉ. राजेंद्र वाबळे,अधिष्ठाता, वायसीएम रूग्णालय