कामशेत – दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. त्यात आता सीएनजी देखील 86 रुपयांवरून 93 रुपये प्रतिकिलोवर येऊन पोचला आहे. मागील काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने पेट्रोल – डिझेल च्या किमतीत कपात करून नागरिकांना दिलासा दिला होता परंतु आता सीएनजी दरवाढीने तो दिलासा काढून घेतला आहे.मावळ तालुक्यात अवघे चार सीएनजी पंप असल्याने महाग असला, तरीदेखील सीएनजीकरिता तासन्तास वाट पाहण्याची वेळ मावळवासीयांवर आली आहे.
सद्यस्थितीत महागाई वाढत असून, पेट्रोल- डिझेलच्या दरात कपात झाली असली तरी इतर जीवनावश्यक वस्तू कमालीच्या वाढताना आपल्याला दिसत आहे. रोजच्या वापरात असणाऱ्या सीएनजीच्या दरामध्ये तब्बल 6 रुपयांनी वाढ झाली आहे. सातत्याने वाढणाऱ्या सीएनजीच्या दरामुळे ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत. सुरुवातीला सीएनजी दर कमी होता त्यामुळे सीएनजी वाहनांना चांगलीच मागणी होती; परंतु आता पेट्रोल व सीएनजीचा दर जवळजवळ सारखाच होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर आहे.
सीएनजीचा दर 86 रुपयांवरून आता 93 रुपयांवर पोचला असला तरी सीएनजी भरण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहायला लागत आहे. परिणामी प्रचंड वेळ लागत असल्याने सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना दुहेरी फटका बसत आहे.
सीएनजी गाडी घेतली कारण त्याचा दर पेट्रोलच्या तुलनेत कमी होता. परंतु आता पेट्रोल आणि सीएनजी एकाच टप्यावर आले आहेत. त्यामुळे आता गाडीचा मासिक खर्च व सीएनजीचा खर्च परवडत नाही.
– श्रीपाद शिंदे, सीएनजी वाहनधारक
भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याने, त्यावरील खर्च वाढला आहे. त्यात मुलांच्या शिक्षणाचा खर्च व घर खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बहुतांशी सर्वच गृहिणींना हा त्रास सहन करावा लागत आहे.
– सुरेखा गाडे, गृहिणी.