मोकाट आरोपींच्या मुसक्या आवळणार ; पाटील
नगर – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून औषध फवारणी सुरू असताना स्वच्छता निरीक्षकांना झालेल्या मारहाणी प्रकरणी कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे तसेच आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त प्रदीप पठारे, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्यात बैठक होवून नगरसेवीकेच्या निलंबनाचा सोमवारी प्रस्ताव तयार करण्यात येणार असून मोकाट अरोपींच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील तसेच कामगार युनियनच्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन मिळाल्या नंतर कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
असे कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने नागापूर परिसरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी सुरु असतांना नगरसेविकेच्या दिराने त्याच्या मित्रांसह दोन कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली होती. त्यात दोघे गंभिर जखमी झाले होते. त्याच्या निषेधार्थ महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला होता. व मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत, तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना सुरक्षेची हमी मिळेपर्यंत दोन दिवस संप पुकारण्यात आला होता.
मात्र, आज मनपाचे आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपआयुक्त प्रदीप पठारे यांनी कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून कामगार युनियनच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याशी चर्चा करून कामगारांना पोलीस संरक्षण दिले जाणार असून, आरोपींच्या लवकरात लवकर मुसक्या आवळल्या जाणार असल्याचे आश्वसन दिले. त्यानंतर आज दुपारपासून शहरात कचरा संकलन करण्याचे काम सुरु झाले.