नगर -राज्यासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. प्रत्येकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. देशात लॉकडाऊन असल्यामुळे नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये असलेले हमाल, माथाडी व कष्टकरी नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी जिवानवश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. तसेच सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले आहे.
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने हमाल, माथाडी व कष्टकरी नागरिकांना किराणा व भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आ. संग्राम जगताप, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अविनाश घुले म्हणाले की, करोना विषाणूच्या संकटामुळे देश लॉकडाऊन परिस्थितीत असल्याने शहरात हातावर पोटभरणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे. त्यात हमाल, माथाडी व कष्टकरी नागरिकांना माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या सूचनेनुसार नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने किराणा व भाजीपाल्यांचे वाटप करण्यात आले. सभापती अभिलाष घिगे म्हणाले की, शासनाच्या नियमांचे पालन करुन हॅण्डवॉश व सॅनिटायझरचा वापर, जंतूनाशक कीटकफवारणी करण्यात आली.