परमवीर सिंह यांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू

मुंबई – खंडणी वसुली प्रकरणात अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले मुंबईचे परागंदा माजी पोलीस आयुक्‍त परमवीरसिंह यांना निलंबित करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे. राज्याच्या गृहमंत्रालयातर्फे पोलीस महासंचालकांकडे तसा रितसर प्रस्ताव काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमवीरसिंह आणि खंडणी वसुलीचे आरोप असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठवला होता. पण प्रत्येक अधिकाऱ्यावरील गुन्ह्यांची स्वतंत्रपणे माहिती द्या, अशी सूचना गृहमंत्रालयाकडून पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली होती.

त्यानुसार पोलिस महासंचालकांनी स्वतंत्र प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे. त्यात परमवीरसिंह यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार गृहमंत्रालयाने परमवीरसिंह आणि उपायुक्‍त दर्जाच्या दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबीत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

परमवीरसिंह यांच्या विरोधात एकूण तीन विनाजामीन अटक वॉरंट कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आली आहेत. त्यांनी कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुली आपल्या अधिकारपदाच्या काळात केल्याच्या तक्रारी दाखल आहेत.

या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर परमवीरसिंह अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यांचा ठावठिकाणा अजून सापडू शकलेला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.