अहमदाबाद – गुजरात प्रदेश कॉंग्रेस समितीने या राज्यात पदयात्रा काढून घरोघरी जाऊन जनजागरण अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश कॉंग्रेसतर्फे काढण्यात येणाऱ्या या पदयात्रेत महागाई, बेरोजगारी या संबंधात लोकांच्या प्रतिक्रीया नोंदवून घेतल्या जाणार असून संपुर्ण देशभर या यात्रा काढल्या जाणार आहेत.
प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अमित चावडा यांनी सांगितले की, आमचे कार्यकर्ते भाजपचे आमदार आणि खासदारांनाही भेटणार असून ते जनतेच्या मागण्यांची निवेदने त्यांना सादर करणार आहेत.
भारतीय जनता पक्ष सरकारच्या फसलेल्या आर्थिक नितीची फळे केवळ गुजरातच नव्हे तर संपुर्ण देशातील जनतेला भोगावी लागत आहेत या विषयी जनजागरण करण्याचा हा प्रयत्न आहे असे त्यांनी म्हटले आहे. 52 हजार बुथ क्षेत्रात कॉंग्रेसचे कार्यकर्ते पायी जाऊन लोकांशी या मोहीमेत संपर्क साधतील असेही त्यांनी नमूद केले.
गुजरात मध्ये आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेली असून गेल्या एक वर्षाच्या काळात राज्यातील किमान पंधरा लाख लोक पुन्हा दारिद्य्र रेषेच्या खाली गेले आहेत. बड्या उद्योगपतींमुळे हजारो छोट्या व्यापाऱ्यांची दुकाने बंद झाली आहेत असेही चावडा यांनी यावेळी नमूद केले.