दहा कोटी रुपये रकमेवरही सोडले पाणी
टोकियो : जपानच्या विद्यमान राजघराण्यातील राजकन्येने आपला लहानपणचा मित्र असलेल्या एका सामान्य तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी तिला तब्बल दहा कोटी रुपयांच्या रकमेवर पाणी सोडावे लागणार आहे.
जपानमधील प्रथा आणि परंपरेप्रमाणे राजघराण्यातील व्यक्तीला राजघराण्याच्या बाहेर लग्न करता येत नाही. पण जपानमध्ये प्रथमच राजकन्येने सामान्य माणसाशी लग्न करण्याची घटना घडत आहे. जपानची राजकन्या माको हिने आपला लहानपणचा मित्र कुमोरो यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असून या महिन्यात हे लग्न पार पडले जाण्याची शक्यता आहे.
राजकुमारी माको सामान्य माणसाशी लग्न करणार असल्याने तिला राजघराण्यातील व्यक्ती हा दर्जाही आता सोडून द्यावा लागणार आहे. जपानचे विद्यमान सम्राट नारुहितो यांची पुतणी असलेल्या माको हीने 2017 मध्येच या विवाहाची घोषणा केली होती. पण कुमोरोच्या कुटुंबात काही आर्थिक समस्या निर्माण झाल्याने हा विवाह सतत पुढे जात होता. आता मात्र या महिन्यामध्ये हा विवाह संपन्न होणार आहे.
राजकन्या माको आणि तिचा भावी पती कुमोरो यांनी टोकियोतील ख्रिश्चन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्येच आपले शिक्षण पूर्ण केले. 2018 मध्ये कुमोरो आपल्या पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता आता तो पुन्हा जपानमध्ये परतला आहे. या महिन्यात हा लग्न समारंभ संपन्न झाल्यावर दोघेही कायमस्वरूपी न्यूयॉर्कमध्ये सेटल होण्यासाठी जातील अशीही शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी ब्रिटनचा प्रिन्स हॅरी यानेही राजघराण्याबाहेरील व्यक्तीशी लग्न केले होते. अभिनेत्री मेगान मार्कल तिच्याशी लग्न करून प्रिन्स हॅरी चर्चेत आला होता.