नाशिक – महाराष्ट्र पोलीस दलाला एक गौरवशाली इतिहास आहे. आपल्या सर्वांवर एक आधुनिक, प्रभावी आणि संवेदनशील पोलीस सेवा व्यवस्था निर्माण करण्याची खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच, आता तुम्हाला ही नवी सुरुवात संकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून पोलिसांच्या गणवेशाची प्रतिष्ठा आणि मर्यादा नेहमी सर्वोच्च स्थानी ठेवत भविष्याची वाटचाल करायची आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी केले आहे.
महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या 119 व्या सत्राच्या दीक्षांत समारंभात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथक) संजय कुमार, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक राजेश कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, खाकी वर्दीची प्रतिष्ठा आपण जपली आणि उंचावत नेली तर स्मार्ट पोलिसिंग काय असते हे आपण साऱ्या देशाला अभिमानाने दाखवून देऊ शकतो. नागरिकांशी वागताना आपली वर्तणूक सौजन्यशील असली पाहिजे त्यांना यथायोग्य सन्मान द्या त्यांच्या तक्रारीची दखल घ्या. जनतेचे रक्षक म्हणून समाजात वावरताना पीडितांना आणि वंचितांना न्याय देण्याचे कार्य करावे. तुमच्या सकारात्मक वर्तणुकीने खाकी वर्दी बद्दल जनसामान्यांचा आदर भाव वाढलेला दिसेल. आपल्या नोकरीच्या कालावधीमध्ये अनेक मोहाचे क्षण येतील त्याला बळी पडू नका भ्रष्टाचाराला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देऊ नका. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाची दार आपल्याला खुली झाली आहेत हे ज्ञान आत्मसात करा.आणि त्यासाठी स्वतःला अपडेट करत रहा. स्वतःला तंदुरुस्त ठेवा.
राज्य शासनामार्फत पोलिसांसाठी अनेक कल्याणकारी योजनांचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्र पोलीस एक कुटुंब आहे या भावनेतून अनेक सकारात्मक उपक्रम सध्या राबविले जात आहेत. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे राहणीमान जीवनमान सुधारावे यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तसेच आधुनिकीकरणासाठी पुरेसा निधी आणि आवश्यक त्या सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देताना अकॅडमीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी दिली.