पाचगणी(प्रतिनिधी) : महाबळेश्वरनजीक नाकिंदा ते क्षेत्र महाबळेश्वरला जोडणाऱ्या डचेस रस्त्यालगत जंगलामध्ये दोन महाकाय रानगव्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मृत झालेल्यांमध्ये एक नर तर एक मादी रानगवा असून अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी या रानगव्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. अन्नातून विषबाधा झाली असल्याची शक्यता आहे.
या रानगव्यांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करण्यात आले. नाकिंदा ते क्षेत्र महाबळेश्वरला जोडणाऱ्या डचेस रस्त्यालगत असलेल्या जंगलपरिसरामध्ये दोन रानगवे मृत अवस्थेत असल्याबाबतची माहिती वनविभागास मिळाली. या माहितीआधारे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयसिंग सिसोदिया, डॉ. संदीप आरडे यांनी या रानगव्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.
अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी या रानगव्यांचा मृत्यू झाला असावा अशी माहिती मिळत असून अन्नातून विषबाधा झाली असल्याची शक्यता आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावरच रानगव्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल.