पुणे – केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्यावर वादग्रस्त शब्दांत टीका करून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी त्यांना हंगामी अटकपूर्व मंजूर केला आहे.
कुडाळ येथील आमदार वैभव नाईक यांची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली आहे. त्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात काढलेल्या मोर्चात जाधव यांनी भाषण करताना नारायण राणे व त्यांच्या दोन्ही पुत्रांवर वादग्रस्त शब्दांत टीका केली होती.
त्यावर पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने प्रक्षोभक वक्तव्ये करून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक तेढ निर्माण करून त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करण्यास चिथावणी दिल्याची फिर्याद डेक्कन पोलिसात दिली आहे. त्यानुसार जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी भास्कर जाधव यांनी ऍड. विजयसिंह ठोंबरे, ऍड. हितेश सोनार आणि ऍड. संदीप जाधव यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.