विशाल धुमाळ
दौंड -दौंड तालुक्यात आगामी निवडणुकांसाठी भाजपचे आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांच्याकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे, त्यामुळे आमदार कुल व थोरात यांचा उमेदवार निवडीसाठी व इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे आजी- माजी नेत्यांचा कस लागणार आहे.
दरम्यान, सध्या निवडणुका लांबल्याने इच्छुकांकडून बंडखोरी होवू नये म्हणून त्यांचा बंडोबा आधीच शांत करण्यासाठी निवडणुकीच्या अगोदरच काहींना काही पर्याय देता येतोय का याची तपासणी सुरू असून त्या पद्धतीने त्या-त्या इच्छुकांना पदे देण्याचे काम दोन्ही गटांकडून सुरू आहे.
दौंड तालुक्यात राजकारणात सर्वच पक्ष सक्रिय आहेत; मात्र खरी लढत ही कुल-थोरात गटातच होत असते. ते ज्या पक्षात असतात त्या पक्षातमध्येच लढती होतात. सध्या आमदार कुल हे भाजपात तर थोरात हे राष्ट्रवादीत आहेत, त्यामुळे आगामी निवडणूक ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी पहिला मिळणार हे निश्चित आहे.
दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रभागरचना करून यामध्ये हा नेता इच्छुक व तो नेता इच्छुक या प्रकारची चर्चा सुरू झाली आहे करोना कालावधीनंतर सध्या निर्बंध हटविले असल्याने यात्रा-जत्रा, जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होणार आहेत. यामध्ये इच्छुक मेदवार हे आपापल्या परीने स्वतःच्या प्रसिद्धीचा खटाटोप करीत असून त्यात नेत्यांना बोलवून आमची वरपर्यंत ओळख असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गळ टाकत चाचपणी सुरू
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांनी काही नेते कार्यकर्ते आपल्या गळाला लागतात का? यासाठी चाचपणी सुरू केली असून त्यानुसार काही प्राथमिक बैठका ही झाल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोण कोणाकडून लढेल हे लढतीच्या चित्रा नंतरच स्पष्ट होणार आहे.