पुणे – पुणे महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 50 टक्के भागीदारी देण्याचे आमिष दाखवून कोंढव्यातील एकाला 16 लाख 60 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरणबसप्पा खाजप्पा होळीकरी (रा. कोंढवा रोड, बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत बाळासाहेब पासलकर (51, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार मे 2017 ते आजपर्यंत घडला. पासलकर यांचा कोंढव्यात फॅब्रीकेशनचा व्यवसाय आहे. एका मित्राच्या माध्यमातून त्यांची बांधकाम व्यावसायीक होळीकरी याच्याशी ओळख झाली. ओळखीनंतर प्लॅट घेण्यासाठी पासलकर यांनी होळीकरीला ऍडव्हान्स 5 लाख रुपये दिले.
मात्र, पैसे दिल्यानंतरही अनेक दिवस होळीकरीने फ्लॅट दिला नाही. यानंतर पुणे महापालिकेतील कॉन्ट्रॅक्टमध्ये भागीदाने व्यवसाय करू, असे आश्वासन देऊन होळीकरीने पासलकर यांच्याकडून वेळोवेळी आणखी 16 लाख 60 हजार रुपये घेतले. पासलकर यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ऍग्रीमेंटदेखील केले. मात्र, प्रत्यक्षात त्यांना कुठल्याही प्रकारच्या भागीदारीमध्ये घेतले नाही. तसेच, त्यांचे पैसेही परत केले नाहीत. याप्रकरणी पासलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोकुळ राऊत तपास करीत आहेत.