मॉस्को – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. या दोन देशांमध्ये रक्तरंजित संघर्ष जरी सुरू असला तरी काही सामाजिक गोष्टीही समोर येत आहेत. रशियातील एका महिलेने युक्रेनचे नेते झेलेन्सकी यांचे कौतुक केल्याबद्दल आणि त्यांना हुशार आणि हँडसम म्हटल्याबद्दल रशियातील न्यायालयाने या महिलेला शिक्षा ठोठावली असून 40 हजार रुबल चा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.
ओल्गा सेगीना असे या महिलेचे नाव असून गेल्यावर्षी रशियामध्ये लागू करण्यात आलेल्या वॉर सेन्सॉर्शिप कायद्याप्रमाणे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी केवळ हँडसम नसून ते हुशार आणि विनोद बुद्धी असलेली व्यक्ती आहेत असे ओल्गा ने म्हटले होते. त्यामुळे ह्या कायद्याखाली तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मॉस्कोच्या न्यायालयामध्ये केवळ पाच मिनिटात तिच्याविरुद्धची सुनावणी पार पडली आणि तिला ही शिक्षा ठोठावण्यात आली. काही दिवसापूर्वी ओल्गा मास्को मधील एका हॉटेलमध्ये गेली असता तेथे काही लोकांबरोबर तिची चर्चा सुरू असताना तिने युक्रेनच्या अध्यक्षांचे कौतुक केले होते. आठवड्याभरातच पोलीस तिचा शोध घेत आले आणि तिने वॉर सेन्सरशिप कायद्याचा भंग केला असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला.
लगेचच तिच्यावर न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला आणि पण फक्त पाच मिनिटात दोषी ठरवण्यात येऊन 40,000 रुबलचा दंड ठोठावण्यात आला. रशियाच्या मानवाधिकार संघटनेने या घटनेची दखल घेतली आहे पण या संघटनेच्या मर्यादा लक्षात घेता याबाबत ते काही करू शकतील याची कोणतीही शक्यता नाही.