बारामती -गेल्या काही दिवसात माझ्या बाबतीत अफवा व वावड्या उठवल्या जात आहेत. संशय निर्माण केला जात आहे. मी एक घाव दोन तुकडे करणारा माणूस आहे. अफवांना बळी पडू नका. पत्रकार माझ्या मागे हात धुवून लागले आहेत. पण शेवटपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार जो पक्ष निर्णय घेईल त्याच्याशी मी सहमत असेल असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती व निरा – पुरंदर बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता व मतदार मेळाव्यात बारामती येथे अजित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे,सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची चेअरमन पुरुषोत्तम जगताप, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप ,दत्तात्रेय येळे,आधी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, काही विरोधी नेत्यांबाबत माझी भूमिका सौम्य असते असे देखील आरोप केले जातात मात्र तथ्य नाही. विरोधक असले तरी त्यांच्या संदर्भात बोलताना काही सभ्यता देखील पाळाव्या लागतात. विरोधक आहे म्हणून काय त्याच्या गचोरीला धरू का असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला. साईबाबा साहेबांच्या वर देखील कमरेखालचे आरोप करण्यात आले. मात्र त्यांचा कधीही तोल गेला नाही. शक्ती स्थळावर हल्ले केले जात आहेत. चुकीच्या धोरणांच्या बाबतीत विरोधकांना नेहमीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर धावून जाणे कागदी फेकणे हा विरोध मला मान्य नाही असेही अजित पवार यावेळी म्हणाले. गेले दहा महिने शिंदे फडणवीस यांचे सरकार आहे. तेव्हापासून विकास कामे रेंगाळले आहेत असा आरोपही पवारांनी यावेळी केला. शेतकऱ्यांचा माल संपत नाही तोपर्यंत शासनाने सुरू केलेली खरेदी बंद करू नका अशा सूचना वारंवार सरकारला केल्या असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
बारामती बाजार समिती महाराष्ट्रात नंबर वन करणार
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक चांगला आहे. आगामी काळात बाजार समितीची ध्येयधोरणे स्पष्ट आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शी कारभार सुरू आहे. चांगल्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न असून आगामी काळात बारामती बाजार समिती महाराष्ट्रात नंबर एकची बाजार समिती करण्याचा निर्धार अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखविला.