टाकळी भीमातून महिला बालकाला पोहोचवले सुखरुप घरी
राहू – टाकळी भीमा (ता. दौंड) येथील एक मानसिक संतुलन बिघडलेली महिला आपल्या अडिच वर्षांच्या बालकासह भरकटली होती. ग्रामसुरक्षा दल व पोलीस पाटलांच्या मदतीने महिला व बालकास तिच्या घरी सुखरूप सोडण्यात आले आहे.
टाकळी भीमा येथील मेमाणेवाडी फाटा येथील एका घराजवळ (दि. 14) एक मळकट कपड्यातील महिला व अडीच वर्षाचा मुलगा संतोष मेमाणे यांना आढळला. यावेळी मेमाणे यांनी महिलेला धीर दिला. त्यांना जेवण व लहान मुलाला दूध दिले. परंतु संबंधीत महिला प्रश्नांचे उत्तर देत नव्हती. त्यामुळे रात्री साडेनऊच्या दरम्यान मेमाणे यांनी टाकळीच्या पोलीस पाटील यांना माहिती दिली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपत्कालीन 112 नंबरवर फोन करून मदत मागितली.
पोलीस नाईक नारायण जाधव व पोलीस नाईक अक्षय यादव आदींनी त्याठिकाणी भेट देत चौकशी केली. दरम्यान ती महिला वेडसर असून बऱ्याच दिवसांपासून घराबाहेर होती. परंतु तिच्या बोलण्यातून आंधळगावाचा उल्लेख लक्षात आला. त्या दृष्टीने जाधव व यादव यांनी शिरूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून आंधळगावचे सरपंच व पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संबंधीत महिला आंधळगाव येथील असून ती अनेक दिवसांपासून घरात नसल्याची खात्री पटली.कायदेशीर सोपस्कार पार पाडून त्यांना तिला तिच्या घरी
सुपूर्द केले.
याकामी पोलीस नाईक नारायण जाधव, पोलीस नाईक अक्षय यादव,पोलीस पाटील सुरेखा वडघुले, संतोष मेमाणे, अमोल मेमाणे, अनिकेत मेमाणे, विशाल मेमाणे, एकनाथ मेमाणे, प्रदीप मेमाणे, अरुण मेमाणे, प्रतिक मेमाणे, विशाल ठाकूर, रोशन ठाकूर, अनिरुद्ध मांढरे, ऋषी चोथवे, सोमनाथ मेमाणे यांचे सहकार्य लाभले.