पुणे -जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागल्यामुळे करोनामुक्तीचा वेग काहीसा कमी झाला आहे. मागील 15 दिवसांत ग्रामीणमधील करोनामुक्तीचे प्रमाण एक टक्क्याने घटले आहे. 23 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान ग्रामीणमध्ये 5 हजार 168 बाधित सापडले. तर 3 हजार 891 बाधित करोनामुक्त झाले आहेत.
ग्रामीण आणि नगरपरिष हद्दीतील बाधित संख्या तब्बल 97 हजार 531 पर्यंत पोहोचली आहे. तर आतापर्यंत 92 हजार 334 बाधित करोनामुक्त झाले आहेत. सध्याचे बाधित सापडण्याचे प्रमाण पाहिले तर आठ दिवसांत ग्रामीणमधील बाधित संख्या एक लाखांचा टप्पा पार करेल. त्या तुलनेत करोनामुक्तीचा वेग कमी होत आहे. 23 डिसेंबर 2020 अखेर 78 हजार 730 बाधितांपैकी 75 हजार 257 बाधित करोनामुक्त झाले होते.
जवळपास 95.6 टक्के करोनामुक्तीचे प्रमाण होते. जानेवारी महिन्यात हे प्रमाण 96.2 पर्यंत पोहोचले होते; मात्र फेब्रुवारी महिन्यात करोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे ग्रामीणमधील दररोजची बाधित संख्या चारशे ते सहाशेपर्यंत पोहचली. तुलनेने करोनामुक्तची संख्या कमी झाली. 10 मार्च रोजी 95 हजार 956 बाधितांपैकी 91 हजार 227 बाधित करोनामुक्त झाले. म्हणजेच करोनामुक्तीचे प्रमाण एक टक्क्याने घटून 95.1 वर आले आहे.