लंडन: जगभरात करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असताना एक सकारात्मक बातमी आली आहे. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्रोजेनेका यांच्याकडून विकसित करण्यात येत असलेल्या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आली असल्याचे सांगण्यात आले. जगभरात लस विकसित करण्याचे असंख्य प्रयत्न होत असताना चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेला हा पहिला प्रयत्न असून त्यामुळे नक्कीच आशेचा एक किरण निर्माण झाला आहे.
चाचणीच्या अखेरच्या टप्प्यात ब्रिटमधील 10260 वयस्क नागरिक आणि लहान मुलांना ही लस दिली जाणार आहे. भाराताच्या सीरम इन्स्टिट्यूटनेही यात मोठी गुंतवणूक केली आहे. ही चाचणी यशस्वी झाली व लस तयार झाली तर भारतीय नागरिकांना परवडेल अशा दरांत ती उपलब्ध होउ शकते हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशांतही या लसीची चाचणी घेतली जात आहे.
याबाबत बोलताना ऑक्सफर्ड लस संशोधन गटाचे प्रमुख प्राध्यापक अँड्रयू पोलार्ड म्हणाले की, आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाण्यांचे चांगले निष्कर्ष हाती आले आहेत. मात्र ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढविण्यास त्याचप्रमाणे लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या भागांत ती किती परिणामकारक ठरेल याची आता चाचपणी केली जाते आहे.
या चाचण्या यशस्वी झाल्या तर या वर्षाच्या अखेरपर्यंत लस बाजारात आणली जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीच्या जनावरांवर घेण्यात आलेल्या चाचण्या चांगले निष्कर्ष देणाऱ्या ठरल्या असल्याचे ऑक्सफर्डचेच प्रोजेक्ट लीडर प्रा. ऍड्रियन हिल यांनी नमूद केले. ऑक्टोबरमध्ये लस उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनीही व्यक्त केला आहे.
दरम्यान, अमेरिकेची मॉडर्ना इंक आणि चीनची शानोव्हक बायोटेक यांच्याकडून विकसित केल्या जात असलेल्या लसींचा अंतिम टप्पा पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या त्यांना देण्यात आल्या आहेत.