नगर – गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेतेपदी शुक्रवारी भाजपने दावा केला असून महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे गटनेत्या मालन ढोणे यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी महापौरांनी विरोधी पक्षनेतेपदी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना नियुक्तीचे पत्र दिले होते. त्यावेळी हे पद त्यांनी स्वीकारले नाही. तसेच प्रशासकीयस्तरावर तशी कोणीही नोंद झाली नाही. असे असतांना आता भाजपकडून ढोणे यांच्या नियुक्तीची मागणी करणारे निवेदन देण्यात आल्याने हे पद पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
महापालिकेच्या विरोधीपक्ष नेतेपदी भाजपच्या गटनेत्या मालन ढोणे यांची नियुक्ती करावी, असे निर्देश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे दिले आहेत. त्यानुसार भाजपच्या काही नगरसेवकांच्या शिष्ठमंडळाने महापौर रोहिणी शेंडगे यांची आज सकाळी भेट घेऊन विरोधीपक्ष नेतेपदी मालन ढोणे यांची नियुक्ती करा या मागणीचे निवेदन दिले. विशेष म्हणजे भाजपचे नवनियुक्त शहरजिल्हाध्यक्ष ऍड. अभय आगरकर यांना मात्र डावलण्यात आल्याचे चित्र दिसले. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मागणीचे निवेदन महापौरांना देण्यात आले.
यावेळी भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, मनोज दुल्लम, प्रदीप परदेशी, मनोज कोतकर, रामदास आंधळे, अजय चितळे, अजय ढोणे, प्रताप परदेशी, सतीश शिंदे, विलास ताठे, उदय कराळे, राहुल कांबळे, संजय ढोणे, अभिजित ढोणे, पुष्कर कुलकर्णी व शिंदे आदी उपस्थित होते.
महेंद्र गंधे म्हणाले, भाजापचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिकेच्या विरोधीपक्ष नेतेपदी गटनेत्या मालन ढोणे यांची नियुक्ती करावी असे आदेश दिले आहेत. त्यानुसार मनपाच्या उर्वरित चार महिन्यांच्या कालावधीसाठी महापौर रोहिनी शेंडगे यांनी ढोणे यांची विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती करावी या मागणीचे निवेदन दिले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेतेपद यापूर्वी वादग्रस्त ठरले होते. महापौरांनी बाबासाहेब वाकळे यांना नियुक्ती पत्र दिले असतांना भाजपकडून महेंद्र गंधे यांना हे पद देण्याचे पत्र महापौरांना देण्यात आले होते. नियुक्ती एकाची मात्र शिफारस दुसऱ्याची आल्याने वाकळे व गंधे या दोघांनी हे पद स्वीकारले नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून हे पद रिक्त आहे. आता चार महिन्यांसाठी ढोणे यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आल्याने भाजप नेमके काय साध्य करणार हा प्रश्न आहे.
अद्यापही संपत बारस्करच विरोधी पक्षनेते
भाजपला विरोधी पक्षनेतेपदाची संधी असून देखील ते घेता आले नाही. दोन वर्ष पद रिक्त असल्याचे प्रत्यक्षदर्शी वाटत असले तरी कागदोपत्री अजूनही विरोधी पक्षनेते म्हणून राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर हे आहेत त्यांची नामफलक देखील अजून हटविण्यात आलेले नाही. त्यामुळे आता भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.