पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील टीका टीप्पणी मागील काही दिवसांपासून सुरूच आहे. राज्यपालांच्या वयोमानाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केली होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं.
‘तुमचं जेवढं वय आहे, तेवढी शरद पवारांची राजकीय कारकिर्द आहे’, अशी बोचरी टीका रुपाली चाकणकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. ‘राज्यपालांचं वय झालं आणि शरद पवारांचं वय झालं नाही का?’, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला होता. या संदर्भातील एक व्हिडीओ चाकणकर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
चंद्रकांत दादा आपल जितक वय आहे तितक आदरणीय साहेबांची संसदीय कारकीर्द आहे…(1/2)@ChDadaPatil pic.twitter.com/ZBXO0TtBcY
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 17, 2021
‘वयोमानामुळे राज्यपालांना लक्षात राहत नसावं, म्हणून सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या असाव्यात असं शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यावर ‘राज्यपालांचं वय झालं आणि शरद पवारांचं वय झालं नाही का?’, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान राज्यपाल हे भाजपचे पदाधिकारी नाहीत, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी त्यांची बाजू घेण्याचा प्रश्नच नव्हता. चंद्रकांतदादा तुमचं जितकं वय आहे, तेवढी साहेबांची संसदीय कारकीर्द आहे’, असा टोला चाकणकर यांनी लगावला.