मुंबई – जगाला पुन्हा एकदा करोनाने धडकी भरवण्यास सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. चीन नंतर आता देशात ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. यामध्ये करोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 सबव्हेरियंटचा शिरकाव झाला असून, BF.7 चे चार रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. अश्यातच, आता राज्याची राजधानी मुंबईत देखील सतर्कता बाळगली जात असून, मुंबई महापालिकेने काही विशेष सूचना आणि गाईडलाइन्स देखील जारी केल्या आहेत. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी शेअर केली आहे.
मुंबईमध्ये करोना संसर्ग वाढू नये यासाठी कोव्हिड संदर्भातील सूचनांचे पालन करावे, असं आवाहन यातून करण्यात आलं आहे. शहरात ट्रेसिंग टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे. करोना रुग्णांसाठी विशेष रुग्णालय, बेड्स, ऑक्सिजन बेड्सची सोय केली जाणार आहे. तसेच, शहरातील सरकारी रुग्णालय व इतर खाजगी 26 रुग्णालयं हे करोना रुग्णांवर उपचारासाठी तयार असल्याचं सांगितलं गेलं आहे.
बीएमसीच्या नागरिकांना विशेष सूचना :
1. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावे
2. सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे
3. वेळोवेळी हात व्हावे व स्वच्छता बाळगावी
4. आजारी वाटल्यास किंवा लक्षणे जाणवल्यास घरी थांबावे
5. सर्व नागरिकांनी लसीकरण पूर्ण करून बूस्टर डोस घ्यावा.