- दोन दिवसांमध्ये 28 रुग्णांचा मृत्यू तर 2010 नव्या रुग्णांची भर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन दिवसांत करोनाबाधित 2010 रुग्णांची भर पडली आहे. यामुळे आतापर्यंतच्या एकूण करोनाबाधितांचा आकडा 51 हजारांच्या पुढे गेला आहे. दरम्यान या दोन दिवसांमध्ये 28 रुग्णांचा करोनाने बळी घेतला असून एकूण मृतांची संख्या 1058 इतकी झाली आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मंगळवारी दिवसभरात 1025 रुग्णांची नोंद झाली तर 15 जणांचा मृत्यू झाला. तर बुधवारी दिवसभरात 985 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 13 जणांचा मृत्यू झाला. शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 51 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शहरात आजपर्यंत 51307 जणांना करोनाची लागण झाली आहे. मंगळवारी 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील भोसरी, पिंपळे गुरव, निगडी, चिखली, मोशी, डूडूळगाव, सांगवी येथील 8 जणांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील राजगुरूनगर, आंबेगाव, खेड, रांजणगाव, देहूरोड येथील 5 जणांचा मृत्यू झाला.
बुधवारी दिवसभरात 15 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 12 व शहराबाहेरील 3 जणांचा समावेश आहे. शहरातील काळेवाडी, भोसरी, आकुर्डी, वाल्हेकरवाडी, निगडी, दिघी, रहाटणी, चिखली येथील 12 जणांचा तर खेड, चाकण व नानापेठ येथील 3 जणांचा मृत्यू झाला.
शहरातील मंगळवारी 630 व आज 809 अशा 1339 रुग्णांना रुग्णालयातून घऱी सोडण्यात आले. गेल्या पाच महिन्यांमध्ये शहरातील 38196 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 2020 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या शहराबाहेरील 987 करोनाबाधित रुग्ण शहरात उपचार घेत आहेत. तसेच शहरातील 289 रुग्ण शहराबाहेर उपचार घेत आहेत. सध्या शहरात 13963 करोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 5507 रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आणि कोविड केयर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
दिवसभरात 3794 संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांतील 2224 रुग्णांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.