नवी दिल्ली – डोगरी, हिंदी आणि काश्मिरी या भाषांना जम्मू काश्मीरमधील अधिकृत भाषांचा दर्जा देण्यच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. जम्मू काश्मीरमध्ये उर्दू आणि इंग्रजी या अधिकृत भाषा पूर्वीपासूनच आहेत. आता त्यामध्ये अन्य तीन भाषांचाही समावेश करण्यात आला आहे. या संदर्भातील घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.
जम्मू काश्मीर अधिकृत भाषा विधेयक 2020 आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. या विधेयकावर संसदेत चर्चा होणार असल्यमुळे जावडेकर यांनी या विधेयकाबाबत अधिक तपशील दिला नाही.
डोगरी, हिंदी आणि काश्मिरी या भाषांना जम्मू काश्मीरमधील अधिकृत भाषांचा दर्जा मिळावा, अशी स्थानिकांची फार पूर्वीपासूनची मागणी होती. ती सरकारने मान्य केली आहे, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
हे विधेयक म्हणजे स्थानिक नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण करणे एवढेच नाही, तर जम्मू काश्मीरमधील एकतेचे तत्व अबाधित राखण्यासाठी उचलले पाऊल अहे, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.