24 तासांत 1131 जणांना करोनाची लागण : 21 रुग्णांचा मृत्यू
पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन नवीन करोनाबाधितांचा आकडा एक हजाराच्या खाली गेला होता. परंतु गुरुवारी पुन्हा एकदा करोनाबाधितांचा आकडा एक हजाराच्या वर गेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये शहरातील 1105 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 26 अशा एकूण 1131 जणांना करोनाची लागण झाली आहे. तसेच एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार गुरुवारी आढळलेल्या अकराशेहून अधिक रुग्णांमुळे शहरातील आतापर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या 38221 इतकी झाली आहे. गुरुवारी 371 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे एकूण करोनाबधितांपैकी 25770 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.
महापालिकेने आतापर्यंत एक लाख 42 हजार 167 नागरिकांची करोना चाचणी केली आहे. त्यापैकी एक लाख 94 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 1252 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. शहराबाहेरील रुग्ण ही मोठ्या प्रमाणात शहरात उपचार घेत आहेत. सध्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 528 शहराबाहेरील रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्हा रुग्णालयात एकाचा मृत्यू
सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि. 20) करोनाने 88 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला. तर नवीन 17 करोनाबाधित रुग्ण दाखल झाले आहेत. दोन रुग्णांना आज “डिस्चार्ज’ देण्यात आला. 70 वर्षीय ज्येष्ठासह 44 वर्षीय पुरुषाचा त्यामध्ये समावेश आहे. 7 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आल आहे.