कराड – कराड तालुक्यात करोनाचे भय दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. एका आठवड्यात करोनाबाधितांचा आकडा शंभरीकडे वळला आहे. गुरूवारी एका दिवसात करोनाबाधितांची संख्या 14 ने वाढली असून कराड तालुक्यातील करोनाबाधितांचा एकूण आकडा 85 वर गेला आहे.
तालुक्यातील नवीन गावात करोनाबाधित सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय या साखळ्या नक्की कोणाच्या संपर्कातून निर्माण झाल्या याचीच चर्चा शहरात दिवसभरात सुरू होती. दरम्यान, कराड शहरात सापडलेल्या करोनाबाधितास ऍम्ब्युलन्समधून न नेता रस्त्यावरून चालवत नेल्याने नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या.
कराड तालुका जिल्ह्यातील करोनाबाधितांचा हॉट स्पॉट बनला असला तरी वनवासमाची व मलकापूर या दोन भागांत करोना बाधितांची संख्या वाढत होती. मात्र, गुरूवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात एकूण 14 रुग्ण आढळून आले. त्यामध्ये कराड शहर 2, वनवासमाची 2, मलकापूर-अहिल्यानगर 2, आगाशिवनागर 3, उंब्रज 1, करोनामुक्त झालेल्या तांबवे भागात 1 तसेच गमेवाडी, गोटे, बनवडी या गावातही प्रत्येकी एक असे एकूण 14 रूग्ण आढळून आले. कराड तालुका हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला असला तरी शहरवासीय थोडे निर्धास्त होते.
सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील आठ जणांना करोनाची बाधा झाल्याने अनेकांनी भीती व्यक्त केली होती. मात्र, ते रूग्ण हॉस्पिटलशी निगडीत असल्याने काही दिवसातच ती भीती विरून गेली होती. मात्र, गुरूवारी मंगळवार पेठेतील एक 65 वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाल्याचे जाहीर झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचा हडकंप उठला. ही महिला वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील बाधा झालेल्या एका महिला आरोग्यकर्मीच्या संपर्कात आल्याने तिला बाधा झाल्याचे बोलले जात आहे. ही महिला संबंधित आरोग्यकर्मीस दूध घालत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित 65 वर्षीय महिला आणखी किती व्यक्तींच्या संपर्कात आली असेल याची माहिती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
दरम्यान, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील एक चालकाचाही करोना बाधितांमध्ये समावेश असून तो मलकापूर येथील रहिवासी असल्याचे समजते. नव्याने समावेश झालेल्या बनवडी येथील करोनाबाधित रूग्ण ही महिला आहे. ती कराड शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कामास असल्याचे समजते. ही महिलाही वेणूताई चव्हाण हॉस्पिटलमधील आरोग्यकर्मीच्या संपर्कात आल्याचे बोलले जात आहे. तर गमेवाडी येथील करोनाबाधित महिला बाळंतीण असल्याने तिच्या संपर्कात आलेल्यांची माहिती काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच करोनामुक्त झालेल्या तांबवे येथे कराड तालुक्यातील पहिला करोनाबाधित रूग्ण सापडला होता.
तो रूग्ण बरा होऊन गेल्यानंतर तांबवेवासियांनी नि:श्वास सोडला होता. मात्र, गुरूवारी तांबवेतील जावई असणाऱ्या एकाला करोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तांबवे ग्रामस्थांची भीती पुन्हा वाढली आहे. डेरवण (ता. पाटण) येथील बालकाच्या संपर्कातील उंब्रजमधील बालरोगतज्ज्ञांना करोनाचा संसर्ग झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. डेरवण येथील बाळ करोनामुक्त झाले आहे. तर संबंधित डॉक्टरांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता आणि आता दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे उंब्रजमधील करोना बाधितांची संख्या आता दोन झाली आहे. वनवासमाची, मलकापूर- आगाशिवनगर, खोडशी येथे सापडलेले रूग्ण पहिल्याच साखळीतील आहेत का, की आणखी एखादी नवीन साखळी तयार झाली याबाबत चर्चा सुरू आहे.
याशिवाय गोटे, गमेवाडी येथे सापडलेले करोना रूग्ण नक्की कोणत्या साखळीतील आहेत, यापैकी कोणाला आधीच क्वारंटाईन केले होते का, याची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागातर्फे सुरू होते. दरम्यान करोनाबाधित सापडलेली सर्व ठिकाणे सील करण्यात आली होती. तसेच जंतूनाशक फवारणी करण्यात आली.