नारायणगाव – ट्रकचालकाला अमानुष मारहाण करणाऱ्या नारायणगाव येथील पोलीस अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्यात यावी,अशी मागणी माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नारायणगाव येथे केली.
नारायणगाव येथील ट्रक चालक दिनेश चंद्रकांत जगताप याला नारायणगाव पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी कांदळी येथे मारहाण केली होती. आढळराव पाटील यांनी गुरुवारी (दि.7) नारायणगाव येथे भोसले हॉस्पिटलमध्ये जगताप यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी डॉ. हनुमंत भोसले यांनी उद्या त्यांच्या बोटावर शस्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
आढळराव पाटील म्हणाले की, पोलीस बांधवाप्रती आपल्याला आदर आहे. करोनाच्या प्रादुर्भावात सर्व पोलीस जीव धोक्यात घालून चांगली कामगिरी करीत आहेत. परंतु काही ठराविक पोलिसांच्या चुकीच्या वागणुकीमुळे पोलीस खात्याला बदनामीला सामोरे जावे लागत आहे. मारहाण होऊन जगताप यांची फिर्याद पोलिसांनी का घेतली नाही. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे तक्रार करून मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यावर प्रथम गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परप्रांतीय नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणात एका रात्रीत कांदळी येथे कोठून आले. त्यांना मंचर येथे सोडण्याचा आदेश कोणी दिला. एका मालवाहतूक ट्रकमध्ये इतके लोक बसवून नियमबाह्य वाहतूक करणे धोकादायक असताना पोलिसांनी हा निर्णय का घेतला. तो निर्णय घेण्यासाठी कोणी आदेश दिला, याची चौकशी झाली पाहिजे. यावेळी त्यांच्या समवेत तालुका प्रमुख माऊली खंडागळे, उपसभापती रमेश खुडे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, संतोष दांगट, दिलीप वाजगे, रामदास बाळसराफ आदी उपस्थित होते.