पुणे – सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने शहरातील खासगी वाहनांची संख्या 2022 मध्ये दुपटीने वाढली आहे. परिणामी, जून 2023अखेर शहरातील खासगी वाहनांचा आकडा तब्बल 35 लाख 94 हजार झाला आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून ही बाब समोर आली आहे. 2021 मध्ये शहरात 1 लाख 69 हजार 552 नवीन वाहनांची खरेदी झाली.
तर 2022 मध्ये 2 लाख 55 हजार 757 वाहनांची भर नव्याने पडली आहे.खासगी वाहनांचा वापर वाढल्याने शहरातील ध्वनी प्रदूषण व वायु प्रदूषण वाढण्यासह वाहतूक कोंडी वाढण्यावरही झाला आहे. त्यामुळे, शहरातील पर्यावरण समतोल राखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे.
ध्वनी व वायू प्रदूषणात वाढ
महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या पर्यावरण अहवालात शहरात ध्वनी प्रदूषण तसेच वायु प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ नोंदविली असून ही दोन्ही घटकांचे प्रदूषण मानकांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे, केवळ सणांच्या दिवसांमध्ये या प्रदूषणात वाढ नोंदविली जात होती. मात्र, यंदा पहिल्यांदाच वर्षभर या प्रदूषणात वाढ नोंदवली गेली. त्यात, खराब रस्ते व वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण वाढल्याचे नमूद केले आहे.
वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ
शहराची लोकसंख्या सुमारे 45 लाखांवर असून त्यातील केवळ 8 लाख नागरिकच नियमितपणे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. तसेच पुरेशा बसेस नसल्याने खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. पीएमपीमध्ये साडेतीन हजारांहून अधिक बसेसची आवश्यकता असताना प्रत्यक्षात मात्र 2029 बसेस ताफ्यात आहेत. त्यातील 80 टक्केच मार्गावर असतात. त्यामुळे बसेसची शाश्वती नसल्याने नागरिकांकडून खासगी वाहन वापराला प्रोत्साहन दिले जात आहे.
अहवालात जी 20 चे कौतुक
दरम्यान, शहराच्या पर्यावरण अहवालात पर्यावरण विषयांवर चर्चा अपेक्षित असताना जी 20 परिषदेच्या विवंचनांवर भर देण्यात आल्याचे चित्र आहे. मागील वर्षी पुण्यात जी 20 च्या तीन परिषदा झाल्या. वेगवेगळ्या देशव्यापी विषयांवर झालेल्या चर्चा, निर्णय तसेच ठरावांची माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या शिवाय, पहिल्यांदाच महापालिकेने शहरात राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचीही विस्तृत माहिती देण्यात आली आहे.