आणखी 1,499 करोनामुक्त
पुणे – शहरात नमुने तपासणी संख्या वाढल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांत नवीन करोना बाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. सोमवारीही शहरात नवे 761 बाधित सापडले. तर आणखी 1,499 जण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत डिस्चार्जच्या संख्येने 50 हजार 113 चा टप्पा पार केला आहे. दरम्यान, दिवसभरात करोनामुळे 31 जणांचा मृत्यू झाला.
शहरातील ऍक्टिव्ह करोना बाधितांची संख्या सध्या 15 हजार 43 पर्यंत आली आहे. यापैकी जवळपास निम्मे बाधित होम क्वारंटाइनमध्ये असल्याने रुग्णालये आणि कोविड सेंटरवरील ताणही जुलैच्या तुलनेत कमी झाला आहे.
शहरात आजपर्यंत 3 लाख 24 हजार 721 टेस्ट घेण्यात आल्या आहेत. पुणे शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत टेस्टचे प्रमाणही जवळपास 8 टक्क्यांवर पोहोचले आहे. शहरात सोमवारी 5 हजार 133 संशयितांचे आरटी-पीसीआर आणि अँटिजेन किटद्वारे टेस्ट करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, बाधितांपैकी 738 जण अत्यवस्थ असून 444 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर शहरातील मृतांची संख्या 1 हजार 571 वर पोहोचली आहे.