पिंपरी – सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहराला पावसाने झोडपले आहे. घटस्थापनेपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र, गुरुवारी व शुक्रवारी सलग दोन दिवस दुपारच्या वेळी पावसाने दमदार आगमन करत विजाचा लखलखाट व ढगाच्या गडगडाटासह शहराला जोरदार झोडपले.
सकाळी आकाश निरभ्र होते. परंतु दुपार होताच गुरुवारप्रमाणेच शुक्रवारी देखील पावसाने पुनरागमन केले. काही काळ जोरदार बरसल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी सुमारे एक ते दीड तास मध्यम आणि हलक्या स्वरुपाच्या सरी बरसल्या. शहरात ठिकठिकाणी रास दांडिया, गरबा यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. मात्र, पावसाच्या तडाख्याने शहरातील काही ठिकाणी मंडपांचे नुकसान झाले आहे. तर, काही ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
पेट्रोलपंप पाण्यात, बॅंक कर्मचारीही अडकले
ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथील पेट्रोल पंपामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. तिथेच असलेल्या एका बॅंक परिसरात देखील पाणी शिरल्याने कर्मचाऱ्यांना बाहेर येता येत नव्हते. गस्तीवर असलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी येथील सहा जणांना सुरक्षित बाहेर काढले.
उद्योगांचे लाखोंचे नुकसान
मुसळधार पावसामुळे चिंचवड परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. चिंचवड एमआयडीसी परिसरातील काही कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने उद्योजकांचे नुकसान झाले. नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे थेट कंपन्यांमध्ये पाणी शिरले. यामुळे कच्चा माल वाहून गेला, तर यंत्रे आणि यंत्रांना लावलेल्या मोटारी पाण्यात भिजून खराब झाल्या. पाणी शिरल्यामुळे उद्योजकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.काळभोरनगर येथे प्रतिभा विद्यालयात ऑईल कंपनीचे पाणी घुसल्याची घटना घडली तर, कंपनीत दुसऱ्या पाळीत कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना उशीर झाला. तास दीड तास सुरू असलेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पावसामुळे रस्त्यात पाणी साचले होते.