जकार्ता (इंडोनेशिया) – दक्षिण-पूर्व आशियातील देशांमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची क्षमता दुपटीने वाढवण्याची गरज आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या भागात परिचारिका, आया आणि सुईणींची संख्या अतिशय मोजकी असून त्यामध्ये दुपटीने वाढ होणे गरजेचे आहे. आणखी 10 वर्षात म्हणजे 2030 पर्यंत आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी किमान 1.9 दशलक्ष परिचारिकांची गरज या भागात असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व भागामध्ये बांगलादेश, भुतान, उत्तर कोरिया, भारत, इंडोनेशिया, मालदिव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि तिमूर लेस्ट आदी देशांचा समावेश होतो.
जगभर वाढलेल्या करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर परिचारिका आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ठ काम केले आहे, असे गौरवोद्गार जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने या भागातील “डब्लूएचओ’चे या भागाच्या समन्वयक पूनम खेत्रपाल सिंह यांनी काढले आहेत. या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अनेक माता, नवजात अर्भके, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची सेवा केली आहे आणि त्यांना करोनामुक्त होण्यास मदत केली आहे. असे त्या म्हणाल्या.