वॉशिंग्टन – जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून होणारे अर्थसहाय्य रोखले जाईल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केली. सध्याच्या करोना विषाणूच्या साथीच्या वातावरणामध्ये जागतिक आरोग्य संघटना ही चीन समर्थकाच्या भूमिकेतून कार्यरत आहे. ही संघटना केवळ चीनकडे लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चीन मधून येणारी हवाई वाहतूक थांबवण्याबद्दल केलेल्या सूचनेला जागतिक आरोग्य संघटनेने विरोध दर्शविल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
“”डब्लूएचओ’ला केले जाणारे अर्थसहाय्य आम्ही रोखत आहोत. तसे केल्यावर ही संघटना कशी काम करू शकेल, हेच आम्हाला पाहायचे आहे. या संघटनेने घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा आहे. हे योग्य नाही.’ असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांबरोबरच्या दैनंदिन वार्तालापादरम्यान सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य केले जात असते. जवळपास 58 दशलक्ष डॉलर इतकी रक्कम अमेरिकेकडून या संघटनेला दिली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून अशीच रक्कम या संघटनेला अमेरिका देत आहे. यापेक्षाही मोठी रक्कम अमेरिका देत असते. आरोग्य संघटनेच्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठीच हा निधी दिला जात असतो. हे त्यांचे उपक्रम चांगले असतात, त्याबद्दल आम्हाला नक्कीच आनंद आहे. मात्र अमेरिकेच्या प्रत्येक गोष्टीवर संघटनेकडून विरोधाची भूमिका घेतली जाते, असे ट्रम्प म्हणाले.
“माझ्या प्रवास बंदीच्या निर्णयावर ते सहमत नव्हते आणि त्यांनी प्रत्यक्षात टीकाही केली होती. पण ती त्यांची चोक होती. अनेक बाबतीत ते चुकीचेच होते. जागतिक आरोग्य संघटना खूपच चीनधार्जिणी असल्याचे दिसते आहे.’ अशा शब्दात ट्रम्प यांनी संघटनेवर आगपाखड केली.
दरम्यान, सिनेटर आणि परराष्ट्र संबंध समितीचे अध्यक्ष जिम रिश्च यांनी “डब्ल्यूएचओ’कडून “कोविड-19’च्या हाताळणीची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. केवळ अमेरिकेच्या बाबतीतच नव्हे, तर करोनाच्या साथीबाबत जगभरातल्या उपाय योजनांबाबतही जागतिक आरोग्य संघटना अपयशी ठरली आहे, असे रिश्च म्हणाले.
तर जागतिक पातळीवर आरोग्य सुविधा आणि पारदर्शकतेबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ टेड्रॉस ऍधानॉम घेब्रेरियस यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीबाबत काहीही आक्षेप नोंदवलेले नाहीत. जागतिक आरोग्य संघटना ही चिनी सरकारची राजकीय बाहुले बनले आहे. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे, अशा शब्दात रिश्च यांनी थेट टीका केली. जागतिक आरोग्य संघटनेकडून “कोविड-19’चा विषय कसा हाताळला गेला हे त्रयस्थांकडून तपासले जाणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
अमेरिकेतील डझनभर खासदारांचीही मागणी
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेरियस यांच्या कार्यपद्धतीविरोधात मोठा असंतोष व्यक्त होतो आहे. डझनभर खासदारांनी जागतिक आरोग्य संघटनेला अर्थसहाय्य न करण्याचा कायदा करण्याचा आग्रह धरला आहे. जोपर्यंत डॉ. घेब्रेरियस हे राजीनामा देत नाहीत आणि “कोविड-19’ची समस्या हाताळण्यात चीनला आलेल्या अपयशाची चौकशी आंतरराष्ट्रीय आयोगाकडून केली जात नाही, तोपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेचे अर्थसहाय्य रोखण्याची मागणी या खासदारांनी केली आहे.