ढेबेवाडी – कुसूर, ता. कराड येथील ऋतुराज दिलीप देशमुख (वय 31) या युवकाचा ढेबेवाडी, ता. पाटण येथे सोमवारी (दि. 18) रात्रीच्या 10 च्या सुमारास दगडाने ठेचून खून करण्यात आला. याबाबत माहिती मिळताच ढेबेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अक्षय दिलीप देशमुख यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, वैभव काळे (रा. मालदन, ता. पाटण), उमर मुल्ला (रा. ढेबेवाडी, ता. पाटण) आणि शुभम खेडेकर (रा. ढेबेवाडी, ता. पाटण) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वांग नदीपासून अलीकडे ढेबेवाडी-कराड रस्त्याला जोडून तयार केलेल्या कच्च्या रस्त्यावर काल (दि. 18) रात्री 10 च्या सुमारास ऋतुराज देशमुख हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सपकाळ व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने देशमुख यांना रुग्णवाहिकेतून कराड येथील रुग्णालयात नेले.
मात्र, वाटेतच देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तपासास गती दिली आहे. पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड, सपोनि अभिजित चौधरी, अन्य पोलीस अधिकारी, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले होते. सपोनि अभिजित चौधरी तपास करत आहेत.