सातारा – शहरात मध्यरात्री घडलेल्या खळबळजनक घटनेमुळे शहर व परिसर हादरला आहे. कमानी हौद परिसरात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. गोळीबार करणारे संशयित रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती आले नव्हते.
या घटनेत सहा जणांच्या टोळीने एकाला दुचाकी मागे घेतली नाही म्हणून मारहाण केली व एकाने फायरिंग केले. सुदैवाने यात कोणी गंभीर जखमी झाले नसून परिसर मात्र भीतीने हादरून गेला. या सहा संशयितांचा पोलीस शोध घेत आहे. गुरुवार पेठ परिसरात दिवसभर पोलीस बंदोबस्त होता. या घटनेत विशाल अनिल वायदंडे (वय 27, रा. शनिवार पेठ, सातारा) व त्याचा मित्र जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेली आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कमानी हौद परिसरात मध्यरात्री एकच्या सुमारास वायदंडे याच्यावर गोळीबार करण्यात आला. संशयिताने चार राऊंड फायर केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात बंदुकीची एकच बुलेट घटनास्थळी आढळून आली आहे. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला असून गोळीबार करणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.