पुणे – पुणे महापालिकेच्या ताब्यात असणारे मल्टिपर्पज हॉल (बहुद्देशीय सभागृह) आता सांस्कृतिक कार्यक्रमांसह लग्न, मुंज, साखरपुडा अशा सोहळ्यांसाठीही भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत.
पालिकेच्या उत्पन्न वाढीकरिता स्थायी समितीने याबाबतचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. एका कार्यक्रमामागे कमीतकमी 5 हजार ते जास्तीत जास्त 15 हजार रुपयांचे भाडे मिळणार असून नागरिकांचा प्रतिसाद पाहून काळानुरूप मल्टिपर्पज हॉलची संख्या वाढविण्यात येणार आहे.
यापूर्वी महापालिकेचे मल्टिपर्पज हॉल सांस्कृतिक कार्यक्रम किंवा समारंभांकरिता देण्यात येत नव्हते. परंतु, करोनाच्या काळातील आर्थिक नुकसान भरून काढण्याकरिता हॉल भाड्याने देण्यात येणार आहेत, अत्यंत माफक दरात असे हॉल उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.
नियमावली तयार…
व्यायामशाळा, भाजी केंद्र, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आदी गोष्टींसाठी मल्टिपर्पज हॉल विचाराधीन होते. परंतु, या हॉलचा वापर निश्चित करण्याचे कोणतेही धोरण निश्चित यापुढे आता ते अन्य कार्यक्रमांनाही देण्यात येणार आहेत. 100 चौ.मी. हॉलचे संपूर्ण दिवसाचे भाडे 5 हजार, तर 400 चौ. मी. क्षेत्रफळाच्या पुढे असणाऱ्या हॉलचे भाडे 15 हजार एवढे असणार आहे. महापालिकेने हॉल वापराबाबत नियमावली तयार केली आहे.