पुणे – आईची आणि पाच वर्षांच्या चिमुकलीची तब्बल आठ महिन्यानंतर भेट होणार आहे. आई आणि वडील यांच्यात घटस्फोटाचा दावा सुरू असल्याने या माय-लेकीची भेट होऊ शकली नव्हती. पण, आता आईला दि. 13 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत मुलीचा ताबा मिळणार आहे. त्यामुळे संबंधित आईची दिवाळी यंदा घरच्या लक्ष्मीसोबत साजरी होणार आहे.
माधव आणि माधवी (नावे बदललेली) यांच्या घटस्फोटाचे प्रकरण येथील कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहे. माधवी यांनी घटस्फोटासाठी दावा दाखल केला आहे. दोघेही जुलै 2019 पासून वेगळे राहत आहेत. त्यांना डॉली (नाव बदललेले) नावाची पाच वर्षांची मुलगी असून तिचा ताबा माधव यांच्याकडे आहे. माधवी यांना करोना आणि लॉकडाऊनमुळे गेले आठ महिने मुलीला भेटता आलेले नाही.
त्यामुळे किमान दिवाळी तरी मुलीसोबत साजरी करता यावी, यासाठी तिचा ताबा मिळावा म्हणून ऍड. भूषण कुलकर्णी यांच्यामार्फत अर्ज केला होता. त्यावर करोनाचे कारण पुढे करीत माधवी यांची मागणी फेटाळण्याची मागणी माधव यांनी केली होती. या प्रकरणात न्यायाधीश गिरीश भालचंद्र यांनी दोघांना समुपदेशकाकडे पाठवले.
मात्र, त्यावेळी माधव यांनी मुलीला माधवीकडे न देण्याचा पवित्रा घेतल्याने समुपदेशन होऊ शकले नाही. त्यानंतर मुलीच्या हिताचा विचार करून तिच्या वडिलांनी तिला दोन दिवस आईकडे आणून सोडण्याचा आदेश दिला. डॉली सध्या वशिंड येथे वडिलांसोबत राहत आहे. “माधव यांनी तिला शुक्रवारी (दि. 13) सकाळी साडेदहा वाजता पुण्यात राहत असलेल्या तिच्या आईच्या घरी सोडावे. तसेच माधवी यांनी मुलीचा करोनापासून बचाव होण्यासाठी योग्य ती सर्व खबरदारी घ्यावी,’ असे आदेशात नमूद आहे.