पुणे – महापालिका हद्दीत तीन वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील तब्बल 100 ते 110 सेवा क्षेत्र (ऍमेनिटी स्पेस) “पीएमआरडीए’च्या ताब्यात आहेत. या गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असल्याने या जागा तातडीने मिळव्यात, अशी मागणी पालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महापालिकेच्या मोठ्या प्रकल्पांच्या भूसंपादनाबाबत दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे बैठक झाली. या बैठकीत ही मागणी केल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. ऑक्टोबर 2017 मध्ये महापालिका हद्दीजवळील 11 गावे पालिकेत आली. त्यापूर्वी ती “पीएमआरडीए’ हद्दीत होती. त्यामुळे या गावांतील मोठ्या बांधकामांना मान्यता देताना, नियमानुसार बांधकाम व्यावसायिकांकडून सेवा क्षेत्र ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर या जागा महापालिकेस हस्तांतरण करणे आवश्यक होते. मात्र, अद्यापही एक इंच जागाही “पीएमआरडीए’ने दिलेली नाही. तर पालिकेने दिलेल्या पत्रांनाही कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
त्यामुळे महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे भूसंपादनाबाबत झालेल्या बैठकीत या जागा तातडीने महापालिकेस द्याव्यात अशी मागणी केली. या गावांमध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिकेस या जागा तातडीनं मिळणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
या 11 गावांमधील सुमारे 100 ते 110 ऍमेनिटी स्पेस अद्यापही “पीएमआरडीए’च्या ताब्यात आहेत. या गावांमध्ये पायाभूत सेवा देण्यासाठी या जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे या जागा तातडीने ताब्यात मिळव्यात, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, मनपा