ऐझावल –नोकरदारांप्रमाणे राजकीय नेत्यांसाठी निवृत्तीचे वय निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रभावी आणि मुरब्बी नेते प्रदीर्घ राजकीय खेळी करताना दिसतात. आजही देशात वयाची सत्तरी ओलांडलेले अनेक नेते राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, एका आमदाराने अनोखा आणि दुर्मिळ स्वरूपाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे वयाची पन्नाशी ओलांडल्याने राजकीय निवृत्ती घेण्याचा!
सगळ्यांनाच चकित करणारा निर्णय घेणारे आमदार आहेत बुद्धधन चकमा.
मिझोरममधील नेते असणारे चकमा त्या राज्यातील भाजपचे एकमेव आमदार आहेत. त्यांनी नुकतीच वयाची पन्नाशी ओलांडली. त्यामुळे त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचे ठरवले आहे. आता मला कुटूंबाकडे लक्ष द्यायचे आहे. तसेच, काही सामाजिक कर्तव्येही निभावयाची आहेत. राजकारणात मी माझ्या जागी तरूणांना संधी देऊ इच्छितो, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या चकमा यांनी नमूद केले.
पेशाने डॉक्टर असणाऱ्या चकमा यांचा जन्म 27 जून 1973 या दिवशी झाला. माजी मंत्री असणारे चकमा दोन वेळा आमदार बनले. त्याआधी दोनवेळा ते चकमा स्वायत्त जिल्हा परिषदेचे सदस्य होते. ते सर्वप्रथम 2013 मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार बनले. त्यांना लगेचच मंत्रिपदाची संधी मिळाली. मंत्री असताना 2014 या वर्षीच त्यांनी वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली होती.
मागील निवडणुकीआधी (वर्ष 2018) कॉंग्रेसला रामराम ठोकून ते भाजपमध्ये दाखल झाले. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर विधानसभेत निवडून जाणारे ते पहिले उमेदवार ठरले. मिझोरममधील विधानसभा निवडणूक चालू वर्षीच्या अखेरीस होणार आहे. त्यामुळे आमदार म्हणून चकमा यांचा कार्यकाळ संपत आला आहे. राजकीय निवृत्तीनंतर ते पुन्हा डॉक्टर म्हणून कार्य सुरू करतील. तसेच, ते शैक्षणिक कार्यातही लक्ष घालणार असल्याचे समजते.