- मंत्र्यांच्या आगमनानंतर कशीबशी एका बल्बची व्यवस्था
पिंपरी – कृषी विभागाच्या चऱ्होली वडमुखवाडी येथील प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्थेला (रामेती) कार्यालयाला कृषी मंत्री दादा भुसे यांनी नुकतीच भेट दिली. परंतु अतिशय दुरवस्था असलेल्या कृषी विस्तार केंद्रामध्ये कृषी मंत्री आल्यानंतरही अंधारच होता. विनावापर पडून असलेल्या या इमारतीमध्ये मंत्री भुसे यांनी प्रवेश केल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने धावपळ करत एका वीजेच्या बल्बची व्यवस्था केली.
राज्याच्या कृषी विभागाने 2012 मध्ये आळंदी-पुणे रस्त्यालगत वडमुखवाडी येथे प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्थेसाठी (रामेती) 8 कोटी रुपये खर्चून सुसज्ज इमारत बांधली आहे. मात्र ही इमारत विनावापर पडून आहे. तर याठिकाणचे जनरेटरदेखील चोरीला गेले आहे. एका सुरक्षा रक्षकाच्या भरवशावर या इमारतीची सुरक्षा केली जात आहे.
आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्याबाबत वडमुखवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव तापकीर यांनी पंतप्रधान कार्यालय व राज्य सरकारकडे तक्रार केली होती. याची दखल घेत, दादा भुसे यांनी मंगळवारी (दि.8) या इमारतीला भेट देत दिली. मात्र, ते याठिकाणी सायंकाळी आल्यावर लाइटची कोणतीही व्यवस्था नव्हती. अखेरीस प्रवेशद्वारानजीकची वायर व बल्ब आणून तात्पुरत्या स्वरुपात एक बल्ब लावण्यात आला.
या चर्चेदरम्यान विनावापर पडून असलेल्या या इमारतींचा वापर सुरु करण्याकरिता वैभव तापकीर यांनी त्यांना रामेती बाबत सर्व वस्तुस्थितीची माहिती दिली. तसेच त्याबाबत 2017 पासून पाठपुरावा केला जात असल्याचे सांगत मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर मंत्री भुसे यांनी कृषी अधिकारी व पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांना विनावापर पडून असलेली इमारतीचा वापर सुरु करण्याच्या सूचना केल्या. यावेळी महिती अधिकार कार्यकर्ते वैभव तापकीर यांच्यासह मयूर तापकीर, मनसे भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर, प्रमोद तापकीर, निखिल तापकीर उपस्थित होते.
ही इमारत विनावापर पडून आहे. तसेच कृषी विभागाच्या संरक्षक भींतीमुळे पुणे-आळंदी रस्त्याकडून वडमुखवाडीत जाणाऱ्या 18 मीटर रुंद रस्त्याचे काम पूर्ण रखडले आहे. ही बाबदेखील कृषीमंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
अंकुश तापकीर
अध्यक्ष, मनसे भोसरी विधानसभा