अशोक पवार ः घोडगंगा कारखान्याचे बॉयलर अग्नीप्रदीपन
न्हावरे (शिरूर, पुणे) -सभासद हेच कारखान्याचे मालक आहेत. संचालक मंडळ हे विश्वस्त म्हणून कामकाज पाहत असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने कारखाना हा सभासदांच्या जीवावरच चालत असतो. यंदाही सर्व सभासदांनी आपला ऊस घोडगंगा साखर कारखान्यालाच घालावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार यांनी केले.
न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 24व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम संचालक वाल्मिकराव नागवडे व त्यांच्या पत्नी लतिकाताई यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 8) पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अशोक पवार बोलत होते. आमदार पवार म्हणाले, यावर्षीच्या गळीत हंगामासाठी घोडगंगाच्या कार्यक्षेत्रात गाळपासाठी उस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कारखान्याने सन 2020-21 या वर्षीच्या गळीत हंगामासाठी साडेसात लाख मेट्रिक टन उस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे पूर्ण केल्यास कारखाना पूर्वीप्रमाणे सुस्थितीत येऊन कारखान्याचे संस्थापक रावसाहेबदादा पवार यांचे स्वप्न साकार करता येणार आहे.
यावेळी घोडगंगाचे उपाध्यक्ष रंगनाथ थोरात, संचालक प्रा. सुभाष कळसकर, बाबासाहेब फराटे, संतोष रणदिवे, जगन्नाथ जगताप, अर्जुन कोंडे, सुदाम साठे, प्रशांत होळकर, बाळासाहेब ढमढेरे, उत्तम सोनवणे, पोपटराव भुजबळ, बिरा शेंडगे, शालन काळे, मनिषा सोनवणे, सचिन मचाले, दिलीप मोकाशी, नरेंद्र माने, रामअण्णा नागवडे, दत्तात्रय फराटे, अनिल वाबळे, कार्यकारी संचालक प्रविण शिंदे यांच्यासह पत्रकार, अधिकारी, कर्मचारी, सभासद, शेतकरी बांधव उपस्थित होते. कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दिवंगत संभाजीराव पाटील यांना उपस्थितांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचलन मंगेश ढवळे यांनी केले तर दिलीप मोकाशी यांनी आभार मानले.