आझमगड- उत्तरप्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील पोवाल गावात एका स्थानिक भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. अर्जुन यादव असे या नेत्याचे नाव असून ते क्षेत्र पंचायतीचे सदस्य होते. ते 46 वर्षांचे होते.
गुरुवारी रात्री आपले दुकान बंद करून ते घराकडे परतत असताना अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले पण त्यापूर्वीच ते गतप्राण झाले होते. हल्लेखोरांची माहिती मिळाली नसून पोलीस हल्लेखोरांना लवकरच गजाआड करतील अशी माहिती पोलीस अधीक्षक सुधीरकुमार सिंह यांनी दिली.
त्यांच्या हत्येनंतर त्या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी नागरीकांना शांततेचे आवाहन करीत तेथील बंदोबस्त वाढवला आहे.