पुणे – मराठी चित्रपट सृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होण्यास सुरुवात झाली आहे. विविध विषय घेऊन नवनवीन कलाकार सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. अशाच वातावरणात परी प्रॉडक्शन एक नवीन विषय घेऊन सर्वांसमोर येत आहे. वेगाने प्रगती करत असलेल्या या जगात अस्सल गावाकडची आगळी वेगळी प्रेमकथा दाखवणाऱ्या ‘शिणवार’ या मराठी सिनेमाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा नुकताच (22 जाने पुण्यात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले होते.
शिणवार या चित्रपटातून अनेक नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये चित्रपटात प्रमुख भूमिकेत राहुल शिंदे, परी पटेल, प्रशांत महाजन आणि शुभांगी देवकुळे दिसणार आहेत. चित्रपटाची कथा विलास शिंदे यांच्या निर्मितीतून तयार झाली असून चित्रपटाचे दिग्दर्शन बाबासाहेब लाटे यांनी केले आहे.
अस्सल गावराण मातीचा तडका असणाऱ्या या चित्रपटाची मांडणी अतिशय उत्तम पद्धतीने केली असल्याचे सांगत मेघराज भोसले यांनी चित्रपटाचे निर्माते विलास शिंदे, चित्रपटाचे दिग्दर्शक बाबासाहेब लाटे यांच्यासह संपूर्ण टीमचे कौतुक केले. तसेच ग्रामीण भागातील गोष्टीवर आधारलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण करेल अशी आशा यावेळी निर्माते विलास शिंदे यांनी व्यक्त केली.
या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमात हिंदुत्व शौर्य पुरस्कार प्राप्त शरद मोहोळ, स्वराद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांच्यासह अनेक स्थानिक राजकीय नेते यांच्यसह सिने वर्तुळातील कलावंत उपस्थित होते.