मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘सारा अली खान’चा आगामी देशभक्तीपर चित्रपट ‘ए वतन मेरे वतन’चा ऑफिशल टीझर नुकताच रिलीज झाला आहे. टीझरमध्ये सारा स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसत आहे. कन्नन अय्यर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. ‘ए वतन मेरे वतन’ च्या टीझरमध्ये सारा अली खान स्वातंत्र्यपूर्व रेट्रो लूकमध्ये दिसत आहे.
पांढऱ्या साडीत सारा रेडिओ सेट करताना दिसत आहे. यानंतर ती म्हणते, “इंग्रजांना वाटते की त्यांनी भारत छोडो आंदोलनाचे डोके ठेचले आहे, पण मुक्त आवाज कैद होत नाही. हा भारताचा आवाज आहे’ असं ती म्हणते, आणि तेवढ्यात दारावर कोणतरी ठोठावतो, जे पाहून ती आश्चर्यचकित होते. हे दृश्य या चित्रपटाचा एक महत्वाचा भाग असून, सिनेरसिकांची उत्कंठा आणखीच वाढवताना दिसत आहे.
साराने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘मी खूप उत्साहित आहे आणि सन्मानित आहे की प्राइम व्हिडिओ आणि धर्मिक एंटरटेनमेंटने मला अशा चित्रपटाचा भाग बनण्याची संधी दिली आहे, ज्याबद्दल मी नेहमीच उत्सुक असते. एक अभिनेत्री म्हणून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक भारतीय म्हणून,
View this post on Instagram
शौर्य, सामर्थ्य आणि धैर्याने परिपूर्ण अशी व्यक्तिरेखा साकारण्याचा मला अभिमान वाटतो. कन्नन अय्यर सरांसोबत काम करणे हा एक चांगला अनुभव आहे कारण ते स्वतः चित्रपटाच्या कथेत भावनिकरित्या गुंतलेले आहेत.’ असं देखील अभिनेत्री यावेळी म्हणाली.
दरम्यान, मुंबईतील एका महाविद्यालयीन तरुणीची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. जी एक स्वातंत्र्यसैनिक बनते. हा चित्रपट 1942 मधील भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. आणि भारतातील तरुणांचे धैर्य, देशभक्ती, त्याग आणि साधनसंपत्तीची कथा सांगणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान “उषा मेहता’ यांची भूमिका साकारणार आहे.