कलंदर: महाराजा व सेनापती

उत्तम पिंगळे

(रविवारी पाक प्रधानमंत्री इम्रान खान व आर्मी जनरल बाजवा यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट झाली. त्यातील हाती आलेली माहिती थेट तशीच सांगत आहे.)

महाराजा: या… या… जनरल बसा. (लगेच चहापाण्याची खूण करतात)
सेनापती: काय चालला आहे तुमचा राजनैतिक दबाव वगैरे… काही कामं करणार आहात की नाही?
महाराजा: सबूर सबूर मी माझ्या परीने प्रयत्न करीत आहे ते आपण पाहताच.
सेनापती: हां… देखा हमने, काय मोठे शाही स्वागत झाले आपले ते. चक्‍क मेट्रोमधून आपल्याला प्रवास करावा लागला.
महाराजा (गप्प राहून मग हळूच) हा पण मला ट्रम्प बोलले की मोदी यांनी काश्‍मीरविषयी त्यांच्याशी विषय काढला होता.(त्यास थांबवत)
सेनापती: माहीत आहे मग, अमेरिकन परराष्ट्र विभागाला सारवासारवी करतानाही नाकीनऊ झाले, असे काही बोलणे झाले नव्हते. मग तुम्ही काय केले पुढे?
महाराजा: आम्ही गप्प राहिलेलो नाही. कारण 370 रद्द म्हणजे काश्‍मीरचा इंच इंच भाग पूर्णपणे हिंदुस्तानी मग आपण थोडी जरी घुसखोरी किंवा कारवाई केली तर ते हिंदुस्तानावरील आक्रमक समजले जाऊ शकते.
सेनापती: तांत्रिक बाबी सांगू नका, तुम्ही काय करणार ते सांगा? की आम्ही आता सत्ता हाती घेऊ?
महाराजा: एैसा होगा तो अपनी हालत और बुरी हो जाएगी. एकतर जागतिक बॅंक व नाणेनिधी आपल्या मागण्यांना कचऱ्याच्या टोपलीत टाकतील. हे बघा मी अमेरिका, संयुक्‍त राष्ट्र, चीन, रशिया या सर्वांची काय ते बोललो आहे.
सेनापती: हो, पण एकानेही आपल्या बाजूने शब्दही काढला नाही. एवढे चीन चीन करता त्यांनी तरी काय केले? अमेरिका, संयुक्‍त राष्ट्र एकदम चूप. रशियाने तर हिंदुस्थानचीच बाजू घेतली आहे.
महाराजा: पण, आपण काही युद्ध करू शकत नाही. कारण सर्व जगच हिंदुस्थानच्या बाजूने आहे. तसेच आपल्याकडे इंधनासाठीही पैसा नाही.
सेनापती: काय करणार तेही सांगा पाहू?
महाराजा: सर्व हिंदुस्थानला जाणाऱ्या गाड्या बंद केल्या आहेत. आपले राजदूत माघारी बोलावले आहेत तसेच त्यांचे उच्चायुक्‍तही आपण परत पाठवले आहे. आपण संबंध पूर्णपणे तोडून टाकू.
सेनापती: पण त्याने काय होणार? आपल्याकडेच महागाई वाढणार नाही ना ते पाहा. दुसरा ठोस पर्याय शोधा आपली हवाई हद्द बंद करून टाका भारतासाठी.
महाराजा: पण त्याने काय होणार?
सेनापती: मग एक काम करा. भारतातील एका राज्याने धरणात पाणी खूप साठल्यामुळे दुसऱ्या राज्यात पाणी विसर्ग करून महापुराची स्थिती निर्माण केली, आपण तेच करून पाहा. म्हणजे हिंदुस्थानात महापूर येईल. (निघून जातात)
महाराजा: (सिंचन सचिवांना फोन लावतात) सर्व धरणांचे दरवाजे ताबडतोब बंद करा म्हणजे भारतात महापूर होईल. (सर असे करून कसे चालेल? कारण त्यामुळे खाली जाणारे आपल्याच शहरांचे पाणी बंद होईल तसेच धरणे जास्त आपल्या भागामध्ये आहेत. पूर आला तर तो आपल्याच भागात जास्त येईल तसेच हिंदुस्थानने त्यांच्याकडील नद्या कालव्यांनाही जोडल्या आहेत. त्यामुळे त्यांनाच जास्त पाणी वापरता येईल व आपलेच प्रचंड नुकसान होईल.)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here